वसई : बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई आणि पालघरमधील नागरिकांना केले. तसचे, जबरदस्तीनं जमिनी घेतल्यास बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाकू, अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.


राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातून केली. या दौऱ्यातील पहिली आणि एकमेव सभा वसईत झाली. ऑगस्ट महिन्यापर्यंत राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करुन पक्षबांधणी करणार आहेत. आजच्या भाषणात राज ठाकरेंनी मोदी सरकारला चहुबाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. डिजिटल इंडिया, स्थानिक रोजगार, नाणार अशा अनेक विषयांना यावेळी त्यांनी हात घातला.

राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन आणि मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेस वेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावायच्या आणि 1960 साली जी मुंबई महाराष्ट्राला दीर्घ लढाईने मिळवली तिचा ताबा घ्यायचा हा यांचा डाव आहे."

"नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना अजून देखील गुजरात आठवतो. जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरू शकत नाही तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा?" असा सवालही राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

- पालघरमधून सुरु झालेला दौरा ऑगस्टपर्यंत संपेल, आजची सभा एकमेव जाहीर सभा - राज ठाकरे
- देशात विषयांची कमतरता नाहीच, विषयांचे पुरवठामंत्री खूप आहेत - राज ठाकरे
- महाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे - राज ठाकरे
- मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे! - राज ठाकरे
- नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत - राज ठाकरे
- बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान - राज ठाकरे
- जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा? - राज ठाकरे
- मोदी म्हणतात, आमच्यामुळे वीज आली, मग 2014 आधी आम्ही अंधारात होतो का? - राज ठाकरे
- फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं - राज ठाकरे
- महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या - राज ठाकरे
- नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावे, असे म्हणणारा या देशातील पहिला माणूस मी होतो - राज ठाकरे
- मोदींएवढा माणूसघाण्या माणूस बघितला नाही - राज ठाकरे
- नोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे? - राज ठाकरे
- मराठी मुसलमान राहतो, तिथे दंगली होत नाहीत - राज ठाकरे
- हे राज्य एकदा राज ठाकरेच्या हातात देऊ बघा - राज ठाकरे

VIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण :