मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव, मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून ताप आणि खोकला येत असल्याने काल (सोमवारी) चाचणी केली होती. आज रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार दोन दिवसांपासून अमित यांना ताप होता. ताप आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, डॅाक्टारांनी घरीच त्यांच्यावर औषध उपचार सुरु केले. कोरोनाची लक्षण असल्याने अमित ठाकरे यांनी खबरदारी म्हणून स्वतःच विलगीकरण केलं होतं. दोन दिवसानंतर ताप तर गेला. मात्र, खोकला जात नव्हता, त्यामुळे डॅाक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घेतली, ज्याचा रिपोर्ट आज दुपारी पॅाझिटिव्ह आला. अमित यांनी त्यांनतर डॅाक्टरांशी बोलून लीलावती रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
अमित यांची प्रकृती ठिक असून डॅाक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरु केले आहेत. अमित यांचं आज लीलावती रुग्णालयात सीटी स्कॅन, ब्लड टेस्ट केलं जाईल ज्यानुसार पुढचे उपचार सुरु केले जाणार आहेत. अमित यांची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे यांच्या सहपरिवारातील सर्वांनी कोरोना चाचणी केली आहे, त्यांचे रिपोर्ट उद्यापर्यंत अपेक्षित आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी लिलावती रुग्णालयात एक छोटी शस्रक्रिया पार पडली. शस्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी राज ठाकरेंना सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे. पायाच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
दरम्यान, शस्रक्रियेनंतर चालताना त्यांना काठीचा आधार घेत चालावं लागणार आहे. पायावरील ताण कमी व्हावा तसेच चालताना त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना काठी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते थेट दादरच्या त्यांच्या निवासस्थानासमोरील अमित ठाकरेंच्या घरी विश्रांतीसाठी गेले आहेत.