मुंबई : राज ठाकरे उद्या दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वापरु नये, अशी मागणी ते निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


उद्या सकाळी राज ठाकरे आणि निवडणूक आयुक्त यांच्यात भेट होणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी  ईव्हीएम विरुद्ध मोर्चा उघडला आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला आहे.



ईव्हीएममध्ये घोळ असून राज्यातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, असं निवेदन राज ठाकरे निवडणूक मुख्य आयुक्तांना करण्याची शक्यता आहे.  तसेच राज्यात ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन येत्या काळात उभं राहण्याची शक्यता आहे. राज ठाकरे, राजू शेट्टी आणि इतर विरोधी पक्ष यांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची उद्याची भेट महत्त्वपूर्ण आहे.


लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा दारुण पराभव केला. राजू शेट्टींनी पराभवानंतर निवडणुकीत पडलेल्या मतांची बारकाईने पाहणी केली असता, यामध्ये तफावत असल्याचं दिसून आलं. या घोळाच्या निर्दशनातून राजू शेट्टी यांनी ईव्हीएममधील घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.