मुंबई : मुंबईच्या मालाडमध्ये इनॉर्बिट मॉलमध्ये पाकिस्तानी ब्रँड्सचे कपडे विकणाऱ्या दुकानासमोर मनसेनं आंदोलन केलं आहे. दुकानात विकले जाणारे पाकिस्तानी कपडेही मनसैनिकांनी यावेळी जाळले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेनं दुकानाला नोटीस दिली होती. मात्र नोटीसकडे दुर्लक्ष केल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.
मालाडमधील इनॉर्बिट मॉलमध्ये "एच एन्ड एम" या कपड्यांच्या दुकानात पाकिस्तानी कपड्यांची विक्री केली जाते. त्याविरोधात आंदोलन करत 18 एप्रिलला मनसेनं आंदोलन केलं आणि दुकानमालकांना पाकिस्तानी कपडे न विकण्याची नोटीसही दिली. मात्र दुकानमालकांनी त्याकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानी कपड्यांची विक्री सुरुच ठेवली. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी आज पुन्हा इनॉर्बिट मॉलसमोर आंदोलन करत दुकानातील पाकिस्तानी ब्रँडचे कपडे जाळले.
या आंदोलनावेळी मनसैनिकांनी पाकिस्तानविरोधी घोषणाही दिल्या. सीमेवर वारंवार होणारे हल्ले आणि शहीद होणाऱ्या जवानांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानमधील ब्रँड्सचे कपडे खरेदी न करण्याचं आवाहनही नागरिकांना मनसेकडून करण्यात आलं. या आदोलनानंतर पाकिस्तानी ब्रँड्सच्या कपड्यांची विक्री सुरु राहिल्यास दुकानात गनिमीकाव्यानं घूसून पुन्हा मोठं आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.