Dombivli News Update : डोंबिवली जवळील संदप गावातील खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश असून हे सर्व जण या खदाणीत कपडे धुण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली आहे.  


अपेक्षा गायकवाड (30), मीरा गायकवाड  (वय 55), मयुरेश गायकवाड ( वय 15), मोक्ष गायकवाड ( वय 13) आणि निलेश गायकवाड ( वय 15 ) अशी पाच मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाने पाच ही मृतदेह बाहेर काढले आहेत. 


संदप गावासह आसपासच्या देसले पाडा , भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संदप  गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. आज सायंकाळच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला आणि तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. त्यावेळी ही दुर्दैवी घडली. या पाच जणांमधील एक जण बुडत असावा व त्याला वाचवण्यासाठी उर्वरित चार जण पुढे आले व या प्रयत्नात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले असून मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 


दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


महत्वाच्या बातम्या


BMC : मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ


Raj Thackeray : खबरदार! माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलाल तर..., राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम