Sandeep Deshpande on Shivsena : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मनसे आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट नाव घेत शिवसेनेवर निशाणा साधला. तेव्हापासूनच दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ही राष्ट्रवादीची 'ढ' टीम आहे, असा पलटवार केला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसे ही भाजपची 'सी' टीम असल्याची टीका पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली होती. याच टीकेला मनसेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरेंना पालिकेतील भ्रष्टाचाराचा हिशोब ईडीला द्यायचाय, असा इशाराही देशपांडे यांनी दिला आहे.


कालच्या गडकरी-राज ठाकरेंच्या भेटीमुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरु झाल्यात. याच मुद्यावरुन मनसेनं शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका केली आहे. तसेच युती आघाडीचा निर्णय राज ठाकरे घेतील, असंही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 


पाहा व्हिडीओ : आमच्या युतीच्या अफवा जरी उठल्या तरी तुम्हाला त्या झोंबतात : संदीप देशपांडे



संदीप देशपांडे बोलताना म्हणाले की, "मला असं वाटतं की, शिवसेना ही राष्ट्रवादीची 'ढ' टीम आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय केलं, कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावं. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. तुमच्यावर जी ईडीला हिशोब द्यायची वेळ आली आहे, ते नीट करा तेवढंच पुष्कळ झालं."


राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "कालची भेट वैयक्तिक भेट होती. आतातरी भाजप-मनसे युतीची चर्चा नाही. परंतु शिवसेनेनं भाजप बरोबर युती केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुक लढली आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राष्ट्रवादीनं 2 दिवसाचं भाजपसोबत सरकारं स्थापन केलं. एवढा व्याभिचार केला आणि आमच्या केवळ अफवा उठल्या तरी यांना झोंबतात."


आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाईमपास टोळी म्हणायचो, कारण ते टाईमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की, भाजपाची 'सी' टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. 'बी' टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे."