मुंबई : "कोरोनाच्या काळात लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे लोक शिवसेनेवर नाराज आहेत. लोकांची मानसिकता शिवसेनेबरोबर जाण्याची नाही. त्यामुळे प्रभाग रचना बदलली असली तरी लोकांची नाराजी बदलू शकत नाही," असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
संदीप देशपांडे म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्यातरी स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले आहेत. कार्यकर्त्यांनी युतीच्या चर्चेत पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आज झालेल्या बैठकीत निवडणुकीचे व्यवस्थान, इच्छुक उमेदवारांची निवड यावर चर्चा झाली. सध्या तरी आम्ही स्वतंत्र लढणार आहे. कोरोना काळात मुंबईतील लोकांना खूप त्रास झाला. यावेळी सत्ताधारी शिवसेना त्यांच्या मदतीसाठी पुढे आली नाही. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. लोकांची मानसिकता शिवसेनेसोबत जाण्याची नसून प्रभाग रचना कितीही बदलली असली तरी लोकांची नाराजी बदलू शकत नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, मुंबईसह 15 महानगरपालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरु झाल्यानं सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मनसेनं इंजिनाची दिशा बदलली, नंतर झेंडा बदलून हिंदुत्ववादाच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप बरोबर युतीची चर्चाही सुरू झाली. परंतु, भाजपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे निवडणुकीत कोणती रणनीती आखणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
2012 च्या निवडणुकीत मनसेनं मुंबई, नाशिक, कल्याण डोंबिवली आणि पुण्यात लक्षवेधी कामगिरी केली होती. नाशिक महापालिकेत तर सत्ताही मिळवली होती. पण 2014 पासून मनसेच्या यशाला उतरती कळा लागली. त्यातून पक्ष अद्यापही सावरलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे आपला करिष्मा दाखवण्यासाठी कोणता मुद्दा चर्चेत आणणार आणि कोणती राजनीती आखणार याची मनसैनिकांनाही उत्सुकता आहे. दरम्यान आजच्या बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पुत्र अमित ठाकरे वांद्रे एमयआजी क्लबमध्ये उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
MNS BJP Alliance : मनसे-भाजप युतीवर संदीप देशपांडे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले....
Praveen Raut Arrested : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक; ईडीची कारवाई