Sandeep Deshpande Attack: मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्ल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. शिवाजी पार्कात संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना काल (3 मार्च) चार जणांकडून मारहाण झाली होती. ते चौघे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. मनसे नेत्यांनी हल्ल्याप्रकरणी थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याकडे बोट दाखवलं आहे. 


संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच, हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिलं आहे. मुंबई पोलिसांकडूनही संदीप देशपांडेंवरील हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. दादर पोलीस स्थानक, शिवाजी पार्क पोलीस स्थानक अशा सर्व जवळच्या पोलीस स्थानकांच्या टीम काल सकाळपासूनच याप्रकरणी तपास करत होत्या. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर नेमके कोण? हल्ल्यामागील त्यांचा नेमका हेतू काय? यांसारख्या अनेक गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच, या घटनेतील संशयित आरोपी आणि संदीप देशपांडेंनी आरोपींचं जे वर्णन केलंय, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


दरम्यान, हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआरची कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मारहाण करताना हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. आज संदीप देशपांडेही पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते कोणता गौप्यस्फोट करतात तेही पाहावं लागेल.


पाहा व्हिडीओ : Sandeep Deshpande Attacked CCTV : संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे सीसीटीव्हीत कैद



संदीप देशपांडेंनी जबाबात नेमकं म्हटलंय काय? 


संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक 5 जवळ एकाने उजव्या पायावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी तीन-चार तरुणांनी स्टंप आणि बॅटने मारहाण केली. त्यातील एकाने माझ्या डोक्यावर बॅट मारण्याचा प्रयत्न केला.


त्यांनी पुढे म्हटले की, हल्लेखोरांकडून शिवीगाळ करण्यात आली. ठाकरेंना नडतोस? वरुणला नडतोस? पत्र लिहितोस, असं हल्लेखोरांनी मला म्हटले. या मारहाणीतून वाचवण्यासाठी काही नागरिक येत असताना त्यांनाही धमकावण्यात आले. त्यानंतर हल्लेखोर राजा बडे चौकाच्या दिशेने पळून गेले असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. हल्लोखोर निघून गेल्यानंतर मित्रांनी तातडीनेउपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात  दाखल केले. 


संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे 25 ते 30 या वयोगटातील होते. हल्लेखोर पुन्हा दिसल्यास त्यांना ओळखणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. 


मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर संदीप देशपांडेंवर हल्ला 


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.