मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी 'मातोश्री' गाठली. नांदगावकरांनी राज ठाकरेंचा निरोप शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांना दिला.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी 'मातोश्री'वर अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज ठाकरेंचा निरोप दिला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन कळवतो, असं शिवसेना नेत्यांनी बाळा नांदगावकरांना सांगितले. मात्र, 'मातोश्री'कडून अद्याप कोणताही प्रतिसाद मनसेला मिळालेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून शिवेसेना-मनसे महापालिकेत एकत्र येणार का, अशा चर्चा होत होत्या. त्यातच आता बाळा नांदगावकरांनी थेट 'मातोश्री'ची पायरी चढल्याने या चर्चांना एक प्रकारे दुजोरा मिळाला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आजच म्हटलं होतं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतिहास घडेल.

आता महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याकडे मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

http://poll.fm/5quf7