मुंबई : मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हुकूमशाही कारभारामुळे  काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप त्यांनी केला.


निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस काँग्रेसपासून दुरावत असल्याचंही आंबेरकर यांनी म्हटलं आहे. संपूर्ण पक्ष संपवण्याची तयारी निरुपम यांनी सुरु केल्याचा घणाघातही आंबेरकरांनी केला. निरुपम यांचं भाजपशी साटंलोटं असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

भुपिंदर हुड्डा यांना अभिनेते धर्मेंद्र यांनी फोन करुन मला तिकीट देऊ नका असं सांगितल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. काँग्रेसच्या चांगल्या उमेदवारांना तिकीट न देण्याचं कट-कारस्थान निरुपम यांना हाताशी घेऊन भाजपकडून केलं जात आहे, असा दावा आंबेरकरांनी केला.

काँग्रेसच्या कामत गटातील स्थायी समितीच्या सदस्या वकारुन्नीसा अन्सारी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या एमआयएममध्ये जाणार असून त्यांना एमआयएमकडून 223 व्या वॉर्डातून उमेदवारीही मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मुंबईत जोरदार धक्का बसला आहे.