मुंबई :  दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park Maidan) शिवसेनेच्या (Shiv Sena) कोणत्या गटाची सभा होणार यावरून यावर्षीदेखील संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने (Shiv Sena UBT) आज आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयाला (BMC G-North Ward Office) भेट देत सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ मुंबई महापालिका प्रशासनाने ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) आश्वासन दिले आहे. मात्र,  ठाकरे गटाच्या आधीच शिंदे गटाने मैदानासाठी अर्ज केला असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला दिले. मात्र, या मुद्यावरून ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून महापालिका बनवाबनवी करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 


मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी यावर्षीदेखील संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने 7 ऑगस्ट रोजी मैदानाच्या परवानगीसाठी पत्र दिले होते. त्यानंतर महापालिकेकडून कोणतेही उत्तर न आल्याने आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने अनिल परब यांच्या नेतृत्वात महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवाजी पार्क मैदाना संदर्भात बीएमसी चा निर्णय नेमका काय ? याबाबत जाब ठाकरे गटाने विचारला. यावर महापालिकेने काही निकषांच्या आधारे आम्ही दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्याच वेळी शिंदे गटाने 1 ऑगस्ट रोजी पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले. त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. 


मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार एक ऑगस्टला मुंबई महापालिकेला शिवसेना शिंदे गटाचे पत्र प्राप्त झाले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने सात ऑगस्टला पुन्हा एकदा पत्र शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे यासाठी पत्र दिले. तर शिवसेना ठाकरे गटाकडून 7 ऑगस्टलाच शिवाजी पार्क मैदान मेळावा यासाठी पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व निकषांची पडताळणी करून याबाबत निर्णय देऊ असं बीएमसी कडून सांगण्यात आले. 


अनिल परब यांनी काय म्हटले?


शिवसेना शिंदे गटाच्या पत्रावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. या संदर्भातील नोंद मुंबई महापालिका प्रशासनाने दाखवावी असे आव्हान ठाकरे गटाने दिले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटले की, शिंदे गटाने जर एक तारखेलाच पत्र दिले असेल तर त्यांचे 7 ऑगस्ट रोजी स्मरण पत्र हवे. मात्र, दोन्ही पत्रातील मजकूर, संदर्भ क्रमांक एकच आहे. त्यामुळे यात लपवाछपवी असल्याचा संशय आहे. आमच्या पत्रानंतर शिंदे गटाने पत्र दिले असावे आणि महापालिकेच्या नोंदीत फेरफार करून हे पत्र एक तारखेला मिळाले असावे असे दाखवण्यात आले असावे, अशा संशय त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेकडे याबाबत आलेल्या पत्राबाबत आमदारांच्या अधिकारानुसार आणि माहिती अधिकारातंर्गत माहिती मागवण्यात येणार आहे. महापालिका काय निर्णय घेणार, त्यावरून आम्ही पुढील निर्णय घेऊ. मैदानासाठी कोर्टातही दाद मागू असे संकेतही परब यांनी दिले.