मुंबई : मराठी माणूस आणि मराठी मतांचं राजकारण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापालिका निवडणुकीत 7 उत्तर भारतीय चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. मनसेचा युतीचा प्रस्ताव शिवसेनेनं धुडकावल्यानंतर मनसेही स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

मराठी मतांचं राजकारण करणाऱ्या मनसेनं या महापालिका निवडणुकीत परप्रांतियांचं वर्चस्व असलेल्या वार्डांमध्ये परप्रांतियांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात असल्फा परिसरातील वार्ड क्रमांक 160 मधून शुभ्रांशु दिक्षीत यांच्यासोबतच अन्य 6 वार्डांमध्ये परप्रांतियांना उमेदवारी दिली आहे. परप्रांतिय उमेदवारांना परप्रांतियांचं वर्चस्व असलेल्या भागात उमेदवारी देऊन त्या परिसरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मनसेनं चालवला आहे.

उत्तर भारतीयांना उमेदवारी दिल्याप्रकरणी मनसेनंही स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षाचा अजेंडा आणि मराठी माणसासाठीच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. तसंच ज्यांची जन्मभूमी भलेही मुंबई नसेल, पण कर्मभूमी मुंबई असलेल्यांना राज ठाकरेंनी उमेदवारी दिल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय.