मुंबई : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेला जोरदार हदरे बसत आहेत. सोमवारी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज मनसेला दुसरा धक्का बसला आहे. मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबेंनी भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मनसेला लागलेल्या या गळतीनंतर मनसेचे काही प्रमुख नेते कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजु पाटील, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत.


मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाचं तिकीट हळबेंना देण्यात आलं होतं, त्यात त्यांचा पराभव झाला होता.


कोण आहेत मंदार हळबे?

कल्याण डोंबवली महापालिका 2010 च्या निवडणुकीत मंदार हळबे यांनी मनसेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली .2015 ते 2020 च्या कालावधीत त्यांनी मनसे विरोधी पक्ष नेता ,गटनेता या पदांची जबाबदारी पार पडली. सभागृहात अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना घाम आणला होता. याच दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मनसेकडून डोंबिवली विधानसभेची उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांचा पराभव झाला. मंदार हळबे मनसेत असले तरी आरएसएसचा पगडा त्यांच्यावर कायम होता. गेल्या अनेक दिवसांपासून हळबे भाजपमध्ये जाणार असल्याबाबत चर्चा रंगल्या होत्या आज अखेर त्यांचा प्रवेश झाला. मंदार हळबे हा सुशिक्षित ब्राह्मण चेहरा असल्याने डोंबिवलीमध्ये हळबे यांचा प्रवेश भाजपच्या पथ्यावर पडू शकतो तर हळबे यांच्या जाण्याने डोंबिवली मतदारसंघात मनसेला याचा फटका बसू शकतो.

मनसे भाजप युतीबाबत प्रश्नचिन्ह कायम

तर दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसे युती बाबत चर्चा रंगल्या होत्या. याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून दुजोरा दिला नसला तरी तसे संकेत देखील देण्यात आले होते. मात्र मनसेच्या मोठया नेत्याला भाजपने गळाला लावल्याने मनसे भाजपात पुन्हा दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डोंबिवलीचे मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांच्यासह मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी आपल्या हातावर शिवबंधन बाधलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे डोंबिवलीतील एक आक्रमक नेते अशी राजेश कदम यांची ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून झालेल्या प्रत्येक राजकीय आंदोलनामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



MNS | मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष शिवसेनेत, मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांच्या हाती शिवबंधन