मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. रविंद्र नाट्य मंदिरात मुंबई आणि ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला नाही. नोटाबंदीमुळे देशाचा फायदा होत असेल तर मोदींचं स्वागत आहे. पण विचारपूर्वक निर्णय घेतला नसेल तर देश खड्ड्यात जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. सरकार रोज नवीन उपाय शोधत आहे, कधी मर्यादा वाढवतात, कधी वृद्धांसाठी रांगा, याबाबत आधी विचार केलाच नव्हता, असं राज यांनी सांगितलं.
काळा पैसावाल्यांवर धाडी का नाहीत?
राज ठाकरे म्हणाले की, "काळा पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकल्या नाहीत? सामान्य लोक रांगेत का आहेत? बँकांच्या रांगेत आज जवळपास 40 लोकं गेली जी सामान्य माणसं होती, यात एकही काळा पैसेवाला आहे का?"
काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटबंदीचा निर्णय घेतला आणि भाजपचेच खासदार जनार्दन रेड्डी मुलीच्या लग्नावर 500 कोटी रुपये खर्च करतात. काँग्रेसच्या काळात भाजपच्या याच नेत्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतरही हा खासदार 500 कोटी रुपये खर्च करुन मुलीचं लग्न करतो, असा टोला रा ठाकरेंनी लगावला.
भाजपने 2014 च्या निवडणुकांचा हिशेब दिलेला नाही : राज ठाकरे
नरेंद्र मोदी, तुम्हाला काळ्या पैशाबद्दल इतका तिरस्कार होता, तर एक सांगा, तुम्ही निवडून कसे आलात? भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकांचा हिशेब दिलेला नाही. अरुण जेटलींनी लोकसभा निवडणूक लढवताना 82 लाख रुपये कॅश जाहीर केली होती मग ती रक्कम पण काळा पैसा म्हणायचा का?, असा जळजळीत प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
'सकाळी गोव्यात हुंदका, संध्याकाळी बारामतीत पवारांचं कौतुक'
या मेळाव्यात मनसे अध्यक्षांनी मोदी-पवार भेटीचाही समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, "मोदी सकाळी गोव्यात हुंदका देतात आणि संध्याकाळी बारामतीत जाऊन पवारांवर स्तुतीसुमनं उधळतात. मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो असं सांगतात. मात्र पवारांचं बोट धरुन तर अजित पवार पण राजकारणात आले."
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- भाजपने 2014 च्या निवडणुकांचा हिशेब दिलेला नाही : राज ठाकरे
- जिल्हा बँका बंद करण्याच्या निर्णयावर मोदी आणि आरबीआयचं एकमेकांकडे बोट : राज ठाकरे
- नोटाबंदीवर अद्याप संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही : राज ठाकरे
- देशात दंगली घडण्याची भीती व्यक्त केलेली, काल सुप्रीम कोर्टानेही तेच मत नोंदवलं : राज ठाकरे
- सकाळी गोव्यात हुंदका, संध्याकाळी बारामतीत जाऊन पवारांवर स्तुतिसुमनं : राज ठाकरे
- रिलायन्स जिओचं मोफत कनेक्शन आणि जुन्या नोटा जमा करण्याची तारीख 30 डिसेंबर, इतका योगायोग कसा? : राज ठाकरे
- दोन हजारच्या नोटा छापायला सहा महिन्यांपूर्वी सुरुवात, मग आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची सही कशी? : राज ठाकरे
- पाचशे-हजारच्या नोटा बंद करुन दोन हजारच्या नोटा आणल्या, अशाने काळा पैसा बाहेर येईल? : राज ठाकरे
- दहा महिन्यांपासून नोटाबंदीची तयारी सुरु होती, तर नोटा छपाईचं टेंडर दहा दिवसांपूर्वी का निघालं? : राज ठाकरे
- इतक्या विश्वासाने देश हातात दिला असताना विचारपूर्वक निर्णय का घेतला नाही? : राज ठाकरे
- एटीएममध्ये नवीन नोटेचा आकार बसत नाही, याचा विचार आधी केला नव्हता का? : राज ठाकरे
- काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकल्या नाहीत?, सामान्य लोक रांगेत का? : राज ठाकरे
- रोज नवीन उपाय शोधतात, कधी मर्यादा वाढवतात, कधी वृद्धांसाठी रांगा, याबाबत आधी विचार केलाच नव्हता : राज ठाकरे
- नोटाबंदीच्या निर्णयानंतर एकमेकांकडे न पाहणारे आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत : राज ठाकरे
- मनसेकडे माणसांची कमतरता नाही, मात्र फंडिंगची होती, इतर पक्ष दोन पायांवर धावणार आणि आम्ही लंगडीनं : राज ठाकरे
- नोटाबंदीचा निर्णय पूर्ण विचारांती नाही : राज ठाकरे
- नरेंद्र मोदींचा निर्णय फसला, तर देश खड्ड्यात जाईल : राज ठाकरे
- नोटाबंदीच्या निर्णयावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया नाहीत : राज ठाकरे
- विचारपूर्वक निर्णय घेतला नसेल तर देश खड्ड्यात जाईल : राज ठाकरे
- नोटबंदीचा निर्णय विचारपूर्वक घेतला नसेल तर देश खड्ड्यात जाईल : राज ठाकरे
- नोटबंदीच्या निर्णयाचा फायदा होणार असेल, तर हरकत काय : राज ठाकरे
- नोटाबंदी आपल्या पक्षासाठी एकदम चांगली : राज ठाकरे