मुंबई : अनेक वेळा वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'कोल्डप्ले' बॅण्डचा कार्यक्रम आज मुंबईत होणार आहे. ग्लोबल सिटिझन्सच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील बीकेसी मैदानात आठ तास कोल्डप्ले बॅण्डची कॉन्सर्ट रंगणार आहे.
या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, ए. आर. रहमान, रणवीर सिंग, कतरिना कैफ, विद्या बालन, लिएंडर पेस, साक्षी मलिक यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतील. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
काय आहेत वाद?
सरकार सहआयोजक असल्यानं या कार्यक्रमास अनेक सोयीसुविधा आणि सवलती आपसूक मिळाल्या आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. ज्या क़ॉन्सर्टचं तिकीट लाखो रुपयांच्या घरात आहे, त्यावर सरकार एवढी मेहेरबानी का दाखवत आहे, असा सवाल विचारला जात होता.
या कार्यक्रमात आयोजकांनी सरकारकडे मद्यपानाची परवानगी मागितली होती. सरकारनं त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तसंच यापूर्वी कोणतंही सरकार अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सहआयोजक झालं नसल्याचा दावाही काँग्रेसनं केला.