Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज (14 जून) 54 वा वाढदिवस आहे. मात्र तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. "माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही," असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Continues below advertisement


राज ठाकरे आज म्हणजेच 14 जून रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होतो. पण सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, परंतु त्यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन केलं आहे.


राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं? 
"वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या" असं राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना आवाहन केले आहे. आपल्या ऑडियो पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, "14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिवशी  कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या."


राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संत गजानन महाराज मंदिरात मनसेकडून अभिषेक
आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज पहाटे साडे पाच वाजता मनसे कार्यकर्त्यांनी शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात जमून अभिषेक केला. राज ठाकरे यांच्या प्रकृती आणि दीर्घाआयुष्याबद्दल गजानन महाराज चरणी साकडं घातलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी गजानन महाराजांची आरती करुन राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना केली.