MNS Chief Raj Thackeray Letter : दुकानांवरील मराठी पाट्या लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा लक्षात घेता राज्य सरकारनं नियमात दुरुस्ती केली. परंतु, याचं संपूर्ण श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंचं असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेचं! असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी मनसेनं आंदोलन केलं. मनसैनिकांनी अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षाही भोगल्या. त्यामुळे हे श्रेय इतर कुणीही लाटू नये. ते फक्त मनसैनिकांचं आहे, असं पत्रक राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान, दुकानांच्या पाट्यांवर सर्वात मोठं नाव मराठीत असलं पाहिजे, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं आहे. तसंच दुकानांच्या फलकांवर मराठी भाषेशिवाय इतर कोणती भाषा नको, असंही त्यांनी सुचवलं आहे. 


"ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.", असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेनं मराठी पाट्यांसाठी केलेल्या आंदोलनाची आठवण करुन दिली आहे. 



मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय? 


ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.


काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.


आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा.


ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका!


पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांचं मनःपूर्वक अभिनंदन.


सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे सरकारचा निर्णय 


एकीकडे मुंबईसह राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु असताना अनेक ठिकाणच्या दुकानावरील पाट्या मात्र मराठीत नसायच्या. राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी व्हायची नाही, तसेच दुकानदार यातून अनेक पळवाटा शोधायचे. आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचं. मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा