PM Meeting With All CM : पंतप्रधान यांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.  आरोग्याच्या कारणास्तव हजर राहाता येणार नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आलं आहे.  आज साडेचार वाजता पंतप्रधान कोविडसदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.  त्यामुळे या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 







देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र सहभागी होणार नाहीत.  


सध्या देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान,रविवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार या सर्वांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि मिशन मोडवर प्रौढांसाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी, राज्यांची परिस्थिती, तयारी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.


कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसीकरण हे प्रभावी आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण पूर्ण करावे असे वेळोवेळी पंतप्रधान यांनी आवाहन केले आहे. दरम्यान, भारतात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून देखील माहिती देण्यात आली आहे. भारतासह जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जगभरात मागील आठवडाभरात सरासरी 25 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जगभरातील अॅक्टिव रुग्णाची संख्या वाढून 4 कोटी 49 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,  ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात आतापर्यंत 115 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने होत आहे. आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिका, युके, कॅनडा, डेन्मार्क येथे डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण घटले आहे.


देशातील काही राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.  येथील पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढतच आहे. देशातील 19 राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर चार राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या पाच हजार इतकी झाली आहे.