मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) 53 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.






कार्यकर्त्यांचा उत्साह, 'कृष्णकुंज'च्या गेटवर फुलांची सजावट
असं असलं तरी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा उत्साह मध्यरात्रीपासूनच दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे दादरमधल्या कृष्णकुंज बंगल्याच्या गेटवर मध्यरात्री कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर येऊ नये, स्वत:च्या घरीच थांबावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं.  


कोरोना काळात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्रच काही दिवसांपूर्वी ट्वीट केलं होतं. "मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे. कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. लॉकडाऊन उठला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळे माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात, तिथे सुरक्षित रहा. कुटुंबीयांची आणि आसपासच्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं होऊ नये. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे" असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.