MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour : गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा कदाचित स्थगित होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. पुणे (Pune) दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला (Mumbai) परतले होते. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्याबाबतीत शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत अधिकृत माहिती काही वेळात देतील अशी माहिती मिळत आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र प्रकृती अस्वास्थामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


उत्तर भारतातून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध 


राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. "आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं", असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता. 


मनसैनिकांकडून जय्यत तयारी, पण दौरा स्थगित होणार? 


मनसेच्या बाजूनं राज यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी गाड्यांचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तिथे पोहोचणार आहेत. यासोबतच सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने लखनौ आणि अयोध्येला येणार आहेत. त्यामुळे आता अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.


राज ठाकरेंना बृजभूषण सिंह यांचं चॅलेंज!


राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून कडाडून विरोध केला जात आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यासाठी सभा घेतली होती. तसेच, अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतलीय.