वरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परेलच्या उड्डाणपुलावर गेले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याची माहिती आहे. त्यानंतर उड्डाणपुलावरच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
महापालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी या उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. त्यावेळी आमदार सुनिल शिंदेही उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र अरुंद वाट असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दौऱ्यात घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
लोअर परेलचा रेल्वे पूल मंगळवार (24 जुलै) पासून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लोअर परेल रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाचं वातावरण आहे.
लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत आहेत.