मुंबई: अंबरनाथ लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीहून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. उलट बसून येणाऱ्या प्रवाशांना मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथ स्टेशनवर हुसकावण्याचा प्रयत्न केला. पिक अवर्सला मध्य रेल्वेवर मोठी गर्दी असते. अशावेळी जागा मिळावी म्हणून अनेक प्रवासी उलट प्रवास करुन जागा मिळवतात. मात्र या प्रकारामुळे अंबरनाथवरुन सुटणाऱ्या लोकलमधील प्रवाशांना जागा मिळत नाही, अशी तक्रार आहे.
अनेक प्रवासी अंबरनाथवरुन सीएसटीकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी उल्हासनगर, विठ्ठलवाडीवरुन अंबरनाथकडे जाणारी ट्रेन पकडतात. मग अंबरनाथला पोहोचलेली ट्रेन परत सीएसटीकडे जाते. त्यावेळी उल्हासनगर, विठ्ठलवाडीहून चढलेले लोक आधीपासूनच ट्रेनमध्ये असतात. त्यामुळे अंबरनाथ हे पहिलं स्टेशन असूनही अनेकांना जागा मिळत नाहीत.
या तक्रारी वाढल्यामुळे प्रवाशांनी मनसेकडे गाऱ्हाण मांडलं. त्यानंतर मनसेने आज उलट प्रवास करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
केवळ मध्य रेल्वेवर असा प्रकार घडतो असं नाही, तर तीनही मार्गावर हे सर्रास सुरु आहे.
इकडे पश्चिम रेल्वेवरही विरार-दादर लोकल ही वांद्रे स्थानकात पकडून उलट दादरला जायचं, त्याच ट्रेनने परत विरारला निघायचं असा प्रवास अनेकजण करतात. उलट प्रवास करणारे प्रवासी इतक्या दादागिरीने चढतात की वांद्र्याला ज्यांना उतरायचं असतं, त्यांना उतरताही येत नाही. तीच परिस्थिती दादरला असते. आधी दादागिरी करत चढतात, त्यानंतर उरलेल्या वेळात प्रवाशांना उतरावं लागतं.