मुंबई : मेट्रोतून कच्चे मांस नेण्यावर असलेल्या बंदीच्या विरोधात मनसेने आंदोलन छेडलं आहे. सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्सोव्यात आंदोलन करण्यात आलं.


 
मुंबई मेट्रोतून मासे घेऊन घरी परतणाऱ्या एका प्रवाशाला मेट्रो प्रशासनाने प्रवास करण्यास मज्जाव केला. वर्सोवाहून अंधेरीला जाण्यासाठी संबंधित प्रवासी मेट्रोने निघाला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी एक पोस्टर दाखवून मेट्रोमधून मासे किंवा इतर कोणताही मृत प्राणी नेण्यास बंदी असल्याचं लक्षात आणून दिलं. प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी मनसेने हे आंदोलन केलं.

 
दरम्यान, मेट्रोमध्ये मासे किंवा इतर कोणताही मृत प्राणी नेण्यास बंदी आहे. हा कायदा देशभरातील प्रत्येक मेट्रोमध्ये लागू आहे. मेट्रो अधिनियमात त्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख असल्याचं सांगत मुंबई मेट्रोवनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

 
मेट्रोच्या बंद दरवाज्यात एसीमध्ये सहप्रवाशांना मासे किंवा मृत प्राण्यांच्या वासाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा नियम केल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यांना दंड लागू करण्याचाही प्रश्न नाही, असेही प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.