मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मात्र बंद पुकारु नका, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकत्यांना केलं. राज ठाकरे 22 ऑगस्टला अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यावेळी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते त्याठिकाणी शांततेत उपस्थित राहतील, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.


राज ठाकरे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने सुरु केलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने मनसेचे कार्यकर्ते इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते, सामन्य जनता ईडीच्या कार्यलयाकडे 22 ऑगस्ट रोजी जाणार असल्याची माहती बाळा नांदगावकर यांनी दिली.


आम्ही सर्व शांततेच्या मार्गाने ईडीच्या कार्यालयाकडे जाऊ. पक्षाची भूमिका असल्याने कार्यकर्ते आक्रमक होणार नाहीत आणि पक्षाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनीही आम्हाला सहकार्य करावं, असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं.



सत्ताधारी पक्षातील काही जण आपल्यामध्ये सहभागी होऊन गोंधळ घालून आपल्याला बदनाम करु शकतात. त्यामुळे त्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे, असंही बाळा नांदगावकरांनी सूचना दिल्या.


प्रकाश आंबेडकर यांनी या कारवाईबाबत दहा दिवसांपूर्वीच कल्पना दिली होती. ईडीची राज ठाकरे यांना नोटीस येऊ शकते, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी फोन करुन दिली होती. त्यामुळे सरकार सूडबुद्धीने वागत आहे हे यातून स्पष्ट होत आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं.



काय आहे प्रकरण?


काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.


VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष



संबंधित बातम्या