मुंबई : मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
यामुळे संतप्त मनसैनिकांनी मालाड पोलीस स्थानकाबाहेर जोरदार घोषणाबाजी देखील केली. तसेच मनसेचे नेते नितीन सरदेसाई हे देखील पोलीस स्थानकात दाखल झाले असून त्यांनी काँग्रसे नेते संजय निरुपम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
प्रशासनानं फेरीवाल्याविकोराधात काटेकोरपणे कारवाई करावी. मात्र, तसं होत नसल्यानं मनसेला फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घ्यावी लागल्याचं सरदेसाई म्हणाले.
दरम्यान, मालाडच्या घटनेनंतर याचे पडसाद दादरमध्ये उमटले. मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर दादरमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना लक्ष्य केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मालाडचे मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये हे आज (शनिवार) दुपारी 3.30च्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावानं माळवदे आणि त्यांच्यासोबतच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर थेट हल्ला चढवला.
यावेळी माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.
दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड