Mumbai Metro News: पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi Mumbai Visit) येणार आहे. 19 जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याआधी मेट्रोबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याच्या वाहतुकीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. या प्रमाणपत्रामुळे दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांद्वारे रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग सिस्टीम, सिव्हिल वर्क्स, ट्रॅक आणि स्पीड ट्रायलची चाचणी पूर्ण झाली असून, मेट्रो रेल्वे सिस्टीमच्या सार्वजनिक वापरासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र आज मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला (MMRDA) मिळाले आहे.


एसओडी, डीबीआर, ट्रॅक्शन आणि पॉवर सप्लाय सिस्टीम, रोलिंग स्टॉक, ट्रॅक स्ट्रक्चर, फास्टनिंग सिस्टीम, S&TC आणि पीएसडी साठी RDSO कडून तांत्रिक मान्यता आणि प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, एमएमआरडीएने अंतिम सुरक्षा तपासणीच्या दृष्टीने  CMRS (Commissioner of Metro Railway Safety) च्या मेट्रोच्या विविध घटकांच्या सखोल आणि आवश्यक त्या सुरक्षा चाचण्यांची आवश्यक पूर्तता केल्यानंतर CMRS तर्फे 'एमएमआरडीए'ला सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 


एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले की, मेट्रो मार्ग 2ए  आणि मेट्रो 7 (टप्पा 2) साठी एमएमआरडीएला आज सीएमआरएस सेफ्टी सर्टिफिकेट मिळाले आहे. मुंबईकरांना जागतिक दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मेट्रोच्या या टप्प्याचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुंदवली मेट्रो स्थानकाची पाहणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. 


मुंबई 'मेट्रो 2 ए'चा मार्ग (Metro 2A Route)


'मेट्रो 2 अ' हा  18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत. 


'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके (Metro 7 Route)


मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.  पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते आरे दरम्यान मेट्रो सेवा सुरू आहे.