Mumbai News : मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडीतून (Traffic Jam) सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत (Integrated Transport System) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा (Double Decker Tunnel) पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


वर्षा निवासस्थानी (Varsha Bungalow) यासंदर्भात झालेल्या या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी सादरीकरण देखील करण्यात आले.


मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज : मुख्यमंत्री


एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.


यावेळी आमदार राजेंद्र पटणी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू आदी यावेळी उपस्थित होते.


मुंबई मेरी जॅम... 


एकीकडे विकास काम तर दुसरीकडे ट्रॅफिक जॅम. हे चित्र मुंबईच्या अनेक भागातल्या रस्त्यावर पाहायला मिळतं. मग ते दक्षिण मुंबई असू द्या किंवा मग पूर्व उपनगर किंवा पश्चिम उपनगर... कुठेही जा ...मुंबई मेरी जॅम... आणि या वाहतूक कोंडीतूनच रोजचा प्रवास मुंबईकरांना करावा लागतो. एकीकडे मुंबईत वाहनांची संख्या मागील पाच वर्षात दहा पटीने वाढलीये. तर दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी, विकास कामांसाठी रस्ते खोदून ठेवल्याने तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने मुंबईतल्या अनेक ठिकाणावरची वाहतूक कासवगतीने सुरू आहे. तर मुंबईतल्या अनेक मार्गावर वाहतूक कोंडीची बेटे तयार झाली आहेत. "सरकार योग्य पद्धतीने नियोजन करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नुसतं नियोजन करुन होणार नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा करायला हवी," असं मत वाहतूक नियोजन तज्ज्ञ रोहित कात्रे यांनी नोंदवलं आहे.