मुंबईतील महामार्ग हस्तांतरित करा, 'चिअर्स'साठी MMRDA चा प्रस्ताव?
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2017 09:12 AM (IST)
मुंबई : राज्यातील अनेक महानगरपालिकांपाठोपाठ आता MMRDA अर्थात मुंबई महानगर विकास प्राधिकरणही दारु विक्रेत्यांच्या बाजूनं आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील महामार्ग हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने ठेवला आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्ग एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात यावेत, असा प्रस्ताव एमएमआरडीएनं सरकारला पाठवला आहे. तसं झाल्यास मुंबई आणि ठाण्यालगतची बंद झालेली शेकडो दारुची दुकानं पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा होईल. या महामार्गांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची हमीही एमएमआरडीएने दिली आहे. तसं झाल्यास मुंबई आणि काही प्रमाणात ठाण्यातील बंद पडलेली दारुची दुकानं आणि बार पुन्हा खुले होतील. बांद्रा ते दहिसर आणि सायन ते ठाणे खारेगाव टोलनाक्यापर्यंतचा महामार्ग हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. महामार्गापासून 500 मीटर अंतरावर दारुची दुकानं नसावीत, असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. मात्र महामार्गांचे रस्ते महापालिका किंवा तत्सम विभागात वर्ग करुन या आदेशातून पळवाट शोधली जात आहे. मद्यपान करुन वाहन चालवल्यामुळे महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय आणि राज्य रस्त्यांपासून पाचशे मीटर परिसरात दारु विक्री करण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 हजार दारु विक्रीच्या परवान्यांपैकी 15 हजार परवाने रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली, तर राज्याचा 7 हजार कोटींचा महसूलही बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.