मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या मागे लागून रोज तुमचं रक्त आटत असेल. तुमच्या शेजारी पोलिस मामा लोकांना पिळण्यात दंग असतील, पण ते तुम्हाला रिक्षा-टॅक्सी मिळेल याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. पण तुमच्या-आमच्यासारखाच अनुभव जेव्हा आमदारांना येतो, तेव्हा हा प्रश्न गंभीर होतो आणि त्यावर विधीमंडळात चर्चा होते. त्यावर उपाय काढण्यासाठी मंत्र्यांना धारेवर धरलं जातं.


तीन-तीन आमदारांनी रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीमुळे कसा मनस्ताप होतो, याचा पाढा विधीमंडळात वाचला. आपली कैफियत मांडताना राष्ट्रवादी आमदार आनंद ठाकूर, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण यांचा संताप अनावर झाला होता.

हे सगळं ऐकून अखेर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्याची घोषणा केली. परिवहन विभागातर्फे प्रवाशांना तक्रार करण्यासाठी 1800220110 हा टोल फ्री क्रमांक वाहनात लावणं अनिवार्य केलं जाणार.

सीएसएमटी स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी जायचं होतं, मनोरा आमदार निवासहून जाताना टॅक्सीवाले तयार नव्हते, 10 मिनिटं घासाघीस करावी लागली, अशी तक्रार आमदार आनंद ठाकूर यांनी केली.

आमदार विद्या चव्हाण यांनी रिक्षावाले पूर्वेकडून पश्चिमेकडे जात नाहीत, भाडं नाकारतात अशा तक्रारी केल्या. प्रकाश गजभिये यांनी आमदारांसाठी वेगळा बूथ करणार का, म्हणजे आमदारांना लाईन मध्ये उभं राहावं लागणार नाही, असा अजब सवाल केला.

अर्थात घोषणांचा बाजार नवा नाही. भाडं नाकारु नये असा कायदा असतानाही रिक्षा-टॅक्सीवाले बिनदिक्कत तशी मुजोरी दाखवतातच. मात्र आमदारांना मनस्ताप झाला, तेव्हा कुठे परिवहन मंत्र्यांनी तक्रारीचा क्रमांक रिक्षा-टॅक्सीत लावणं बंधनकारक करण्याची घोषणा केली.

याशिवाय, प्रदूषण कमी करण्यासाठी ओला-उबरला सिटी टॅक्सीचा दर्जा देऊन सीएनजीवर येणं सक्तीचं करणार असल्याचंही दिवाकर रावतेंनी सांगितलं.