खासदार हरवला, अरविंद सावंतांविरोधात काँग्रेसची बॅनरबाजी
एबीपी माझा वेब टीम | 16 Mar 2018 08:59 AM (IST)
आपण यांना पाहिलंत का अशा आशयाचे बॅनर सावंत मतदारसंघात लावण्यात आले आहेत.
मुंबई: दक्षिण मुंबईतील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहिलंत का अशा आशयाचे बॅनर त्यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सुधांशू भट यांनी ही पोस्टरबाजी केली. आपण यांना पाहिलंत का? खासदार हरवला आहे, जिथे असाल तिथून लवकर निघून या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, असं या बॅनरवर लिहिलं होतं. मुंबईतल्या अनेक भागात रात्री हे बॅनर झळकले. मात्र स्थानिक शिवसैनिकांना ही बॅनरबाजी लक्षात आल्यानंतर शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काँग्रेसनं लावलेली पोस्टर्स हटवली. मी एक सामान्य मतदार म्हणून खासदार सावंत यांना अनेकवेळा भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सुधांशू भट यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे अरविंद सावंत हे नेहमीच सर्वांच्या संपर्कात असतात, असा शिवसेनेचा दावा आहे. तसंच हिंमत असेल तर असे बॅनर दिवसा लावून दाखवा, असं आव्हानही देण्यात आलं.