मुंबई : लोकल रेल्वेमध्ये दिव्यांगांसाठी राखीव डब्यात घुसणाऱ्या प्रवाशांवर आता कठोर दंडात्मक कारवाई होणार आहे. यापुढे घुसखोर प्रवाशांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्ष तुरुंगवासाची तरतूद असणारा नवा कायदा अंमलात आणला जात आहे.


सोमवारपासून राबवण्यात आलेल्या मोहिमेत 750 घुसखोर प्रवाशांवर कारवाई झाली आहे. त्यांना समन्स पाठवून न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. अशा प्रवाशांचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

‘राइट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी अॅक्ट’ या 2016 मध्ये आलेल्या नव्या कायद्याच्या आधारे ही कारवाईण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या कायद्यानुसार कारवाई सुरु झाल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट आणि संतापाची लाट पसरली आहे. या कायद्याचा पुनर्विचार करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

राखीव डब्यातून बिनबोभाटपणे प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवाच, मात्र चुकून दिव्यांगांच्या डब्यात शिरलेल्या प्रवाशांवर इतकी कठोर कारवाई रेल्वे प्रशासन करु शकतं, तर भिकारी, गर्दुल्ले आणि चोरट्यांवर कारवाई का होत, अशी चीड प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

अनेक वेळा माहिती नसताना काही प्रवासी दिव्यांगांच्या डब्यात शिरतात. गर्दीच्या वेळी काही जण गडबडीत या डब्यात चढतात. इतकंच नाही, तर आरपीएफ, जीआरपी किंवा रेल्वेचेच कर्मचारीही या डब्यातून प्रवास करताना आढळले आहेत. त्यामुळे कारवाई सौम्य करण्याची मागणी होत आहे.