मुंबई : पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांचा विधानभवनात बैलगाडीने एन्ट्री करण्याचा प्लॅन चांगलाच फसला. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने लांडगे यांना राहत्या घरीच बैलगाडी ठेवावी लागली.

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी आमदार महेश लांडगे आज बैलगाडी घेऊन विधानभवनात प्रवेश करणार होते. त्यासाठी त्यांनी बैलगाडी मुंबईतही आणली होती. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे बैलगाडी घरीच ठेवून त्यांना विधानभवनात जावं लागलं.

राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालीना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक नेते मागील अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. तमिळनाडूमधील जलीकट्टू स्पर्धेच्या धर्तीवर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करावी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी आमदार लांडगे यांनी करत आहेत.