मुंबई : 'महापरीक्षा' पोर्टलच्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडू यांनी माहिती आणि तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी यांना विचारणा केली. या भेटीदरम्यान बच्चू कडू आणि माहिती, तंत्रज्ञान संचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी बच्चू कडू यांनी माहिती आणि तंत्रज्ञान संचालकांवर लॅपटॉप उगारला.


'महापरीक्षा' पोर्टलच्या गोंधळाबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आम्ही विद्यार्थीसोबत आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. तसेच आपल्या स्टाईलमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान संचालकांना समजही दिली. उद्या पुण्यात याबाबत आंदोलन केलं जाणार आहे.


'महापरीक्षा' पोर्टल बंद करण्याची विद्यार्थ्यांची मागणी


'महापरीक्षा' पोर्टल बंद करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. 'महापरीक्षा' हे पोर्टल स्पर्धा परीक्षांचे ढिसाळ नियोजन करुन, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.


महापरीक्ष पोर्टलबाबत विद्यार्थ्यांच्या नेमक्या तक्रारी काय?




  • बैठक व्यवस्था सामूहिक कॉपी करता येईल अशी आहे.

  • संगणक, माऊस परीक्षा सुरु असताना बंद पडणे

  • प्रश्नपत्रिका दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे नसणे

  • दिलेल्या वेळेव्यतिरिक्त सुद्धा लॉग इन करुन पुन्हा पेपर सोडवला जाऊ शकतो

  • मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी पर्यवेक्षक उपस्थित नसणे

  • प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षेची फी 600 रुपये, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये असून हजारोच्या संख्येने विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज करतात