मुंबई : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. भाजपमधील पक्षप्रवेश लांबल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.


अपक्ष माणसाला काय, कुठल्याची पक्षात जाऊ शकतो. कोणत्याही नेत्याशी चर्चा करु शकतो. आपल्याला कोण विचारणारं नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिला की राजकीय गप्पा मारायला मी जात असतो, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.



शिवसेना-भाजपची युती असल्याने दोन्ही नेत्यांशी चर्चा करावी लागले. टरबुजा सुरीवर पडला काय, आणि सुरी टरबुज्यावर पडली काय, टरबुजा तर कापणारच. म्हणजे शिवसेनेत गेलो काय आणि भाजपात गेलो काय, मला तिकीट मिळणारच आहे, नाही तर अपक्ष लढू, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.


दोन्ही नेत्यांची चर्चा झाली की माझा निकाल लागेल. मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही. मला निवडणूक तर लढवायचीच आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.


अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतला होता. मात्र पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.