मुंबई : मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातून चक्क एक मृतदेह गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र हा मृतदेह शवागरातच पडून होता आणि अखेर काल त्या मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईकांकडे अंतिमविधीसाठी देण्यात ही आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस तपास करत होते.


गोवंडी येथे रहाणाऱ्या मेहराज एजाज अहमद शेख या तरुणाची त्याच्याच नातेवाईकांनी आपसातल्या भांडणातून 3 तारखेला हत्या केली होती. जखमी अवस्थेत त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नाही. मृतदेहाची कोरोना टेस्ट करणे गरजेचे असल्याचे रुग्णालयाने नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने सांगितले.


मात्र तिथे असलेल्या पाच-सहा मृतदेहांमध्ये मेहराजचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी प्रशासनाला सांगितले. आणि यामुळे मेहराजचा मृतदेह गायब झाला असल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र मेहराजचा मृतदेह शवागरात होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या स्थितीत असल्याने नातेवाईकांना त्याची ओळख पटत नव्हती.


मात्र पोलिसांनी आणि रुग्णालय प्रशासनने सर्व कागदपत्रे आणि मृतदेहाची छाननी केली. तसेच मेहराजच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती, ज्यात त्याच्या पायात लोखंडी सळी लावण्यात आली होती. या सर्वांची शहानिशा केल्यावर त्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह मेहराजच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.