मुंबई : बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने सर्वानाच सुन्न केलं आहे. सुशांत सिंगने मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस अधित तपास करत आहेत. मात्र सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पटना सारख्या शहरातून मुंबईत येणं आणि सर्वाचं आकर्षण असणाऱ्या बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख सुशांतने निर्माण केली होती.


सुशांतसिंह राजपूतने टीव्ही सीरियल्समधून आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. 'किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता. त्यानंतर टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'मधील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. 2009 ते 2011 पर्यंत ही मालिका सुरु होती. या मालिकेतील अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते.


टीव्हीनंतर 2013 साली 'काय पो चे' या सिनेमातून सुशांतसिंह राजपूतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्याचं नॉमिनेशनही मिळालं होतं. त्यानंतर रोमॅन्टिक कॉमेडी 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमात सुशांत झळकला होता. या सिनेमात सुशांतसिंहसोबत परिनिती चोप्राही होती.


त्यानंतर 2015 साली 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी'मध्ये सुशांत हेराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर सुशांतचा 'पीके' हा सर्वाधिक कमाई करणार सिनेमा ठरला होता. या सिनेमात सुशांत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला होता.


सुशांतसिंग राजपूतच्या कारकीर्दितील सर्वात हिट सिनेमा महेंद्रसिंह धोनीवरील बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' होता. या चित्रपटाच्या अभिनयासाठी सुशांतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्काराचं नॉमिनेशन मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वी आलेले त्याचे 'केदारनाथ' आणि 'छिचोरे' यशस्वी सिनेमे ठरले होते.


Last call from Sushant | सुशांतचा अखेरचा फोन एका अभिनेत्याला, अभिनेत्यानं फोन उचलला नाही