मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन सुरु होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यासाठी बैठका सुरू आहेत. मोटरमन आणि पोलिसांना त्यासाठी स्टँड बाय राहण्याच्या आदेशाचे 2 पत्र मिळाले आहेत.


मध्य आणि पश्चिम रेल्वे या लोकल चालवण्यासाठी तयारी करत असल्याचे कळते आहे. अत्यावश्यक सेवेतील किती प्रवासी असणार, कोणते स्टेशन्स असणार, किती लोकल चालवाव्या लागणार, त्यासाठी पासेस द्यायचे की इतर काही, सोशल डिस्टनसिंग कसे राखले जाणार? अशा सर्व विषयांवर विचार सुरू आहे. राज्य सरकार याबाबत स्थानिक महानगरपालिका आणि रेल्वेशी बोलून मग निर्णय घेतला जाणार आहे.


याच आठवड्यात लोकल सेवा सुरू केली जाणार आहे, अशीही माहिती मिळत आहे. मात्र कोणीही अधिकृतरित्या ही माहिती अद्याप दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मात्र तिन्ही मार्गावर लोकल चालवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्मचारी येऊ लागलेत, अधिकारी प्लानिंग करत आहेत. फक्त अधिकृतरित्या कोणीही सांगत नाही. राज्य सरकारने वारंवार मागणी करूनही रेल्वे मंत्री एकदाही लोकल सुरू करण्यासंदर्भात बैठक घेत नव्हते. आता मात्र हालचाली सुरू झाल्यात.


आजच्या बैठकीतले मुद्दे (सुत्रांची माहिती)




  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एका लोकलमध्ये 700 प्रवासी असतील

  • फक्त फास्ट लोकलच्या स्टेशनवर लोकल थांबतील

  • बाकी ठिकाणावरून या स्थानकांत येण्यासाठी बेस्ट बसेस असतील

  • पासेस बघून प्रवेश दिला जाईल

  • मध्य रेल्वेवर 60 टक्के आणि पश्चिम रेल्वेवर 40 टक्के लोकल धावतील

  • फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, बीएमसी, राज्य सरकारचे कर्मचारी, महापालिकेतील कर्मचारी यांनाच लोकलमध्ये प्रवेश असेल

  • राज्य सरकारने नावांची लिस्ट दिल्यावर रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला जाईल

  • त्यनंतर दिल्लीहून त्यासाठी परवानगी मिळेल


TOP 100 Updates | देशभरातील महत्वाचे शंभर अपडेट्स एका क्लिकवर