मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून 9 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर मतदानासाठी एकूण 774 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांमधील 95 वॉर्डसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, उद्या 94 वॉर्डसाठीच मतदान होईल.

एकूण 510 उमेदवार निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. तर काँग्रेसची एक जागा आधीच बिनविरोध झाली आहे.

एकूण मतदार किती आहेत?

  • एकूण मतदार – 5 लाख 93 हजार 336

  • पुरुष मतदार – 3 लाख 21 हजार 770

  • महिला मतदार - 2 लाख 71 हजार 549

  • इतर मतदार – 17


मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज

निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून 9 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. एकूण 774 मतदान केंद्र आहेत. त्यातील 101 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील 5 मतदान केंद्र मिरारोडलामधील आहेत. तर 4 मतदार केंद्र ही भाईदरमधील आहेत. शहरात अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाहीत.

पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त

निवडणुकीसाठी शहरात सर्व मतदान केंद्रांवर सुमारे 4 हजार 750 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून तीन दिवस शहरामध्ये 161 पोलिस अधिकारी, 1 हजार 842 पोलिस कर्मचारी आणि 300 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी शहरात 3 भरारी पथके, 8 स्टॅटिक सर्व्हिलन्स टिम, 9 व्हिडीओ व्ह्यू‍विंग टीम कार्यरत असून पोलीस विभागामार्फत 8 ठिकाणी चेक पोस्ट नाके स्थापन करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्राँग रुमची व्यवस्था करण्यात आलेली असून सदर सर्व ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

मतदानासाठी काय काय सुरक्षा करण्यात आली आहे, याची सर्व माहिती ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.