ठाणे : मीरा भाईंदरमधील काशिमिरा येथील वर्सोवे गावातील नागरिकांनी यावेळी निवडणुकीत मतदान न करण्याचे ठरवले आहे. आज जवळपास तीस वर्षापासून त्यांच्याकडे स्मशानभूमीच नाही. त्यामुळे स्मशान नाही, तर मत नाही, असा असा पावित्रा येथील रहिवाशांनी घेतला आहे.

वर्सोवे गावची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. तरीही स्मशानभूमी नाही. या सर्व प्रकरणाला एबीपी माझाने वाचा फोडली होती. एकीकडे मीरा भाईंदरपर्यंत मेट्रो ट्रेन प्रकल्पाचं काम सुरु आहे, मात्र दुसरीकडे स्मशानभूमी नसल्याचं विदारक चित्र आहे.

एक जुनं स्मशान आहे. मात्र, तिथे कोणत्याही सुविधा पालिका प्रशासनाने केल्या नाहीत. म्हणजे छप्पर नाही, की स्मशानापर्यंत जाण्यासाठी चांगली पायवाटही नाही. पावसाळ्यात तर स्थिती आणखी वाईट असते. लाकडं ओली राहतात. त्यामुळे प्लास्टिकची शेड बांधून मृतदेहाला अग्नी द्यावा लागतो.

दरम्यान, मीरा भाईंदर महानगरपालिकेची येत्या 20 ऑगस्टला निवडणूक आहे. या निवडणुकीपर्यंत स्मशान बांधून दिलं नाही, तर मत देणार नाही, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे.