मुंबई : मीरा भाईंदर येथील भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या भावाने अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना भरचौकात मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी नरेंद्र मेहतांचा भाऊ विनोद मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्याप विनोद मेहताला अटक करण्यात आलेली नाही.


मीरा भाईंदर मतदारसंघात प्रदीप जंगम हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. जंगम यांचे चार कार्यकर्ते काही पत्रके भाईंदर परिसरात वाटत होते. मात्र पत्रकात नरेंद्र मेहतांविरोधातील मजकूर असल्याचं लक्षात आल्याने विनोद मेहताने त्यांना मारहाण करुन स्वतःच्या गाडीत बसवले आणि तिथेही मारहाण केली, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं.

या संपूर्ण प्रकाराची माहिती या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी नवघर पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर विनोद मेहतानेही या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनजवळ आणून सोडलं आणि निघून गेला. दरम्यान ही घटना शनिवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली.


मात्र पोलिसांनी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा आरोप कुटुंबियांनी केला. अखेर पोलिसांनी शनिवारी रात्री 11.45 च्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.