मुंबई : साताऱ्याच्या खंडाळ्याहून मुंबईत दाखल झालेल्या अर्धनग्न अवस्थेतील शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता उद्योगमंत्र्यांसोबत या शेतकऱ्यांची चर्चा होणार आहे.


दरम्यान, सकाळपासून मानखुर्दमध्ये अडवलेल्या शेतकऱ्यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये त्यांना पोलिसांनी अडवलं.

एबीपी माझाने सातत्याने या शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. त्यांच्या व्यथा, त्यांचा आक्रोश जनतेसमोर मांडला. त्यानंतर सरकारला जाग आली असून, उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी या शेतकऱ्यांना वेळ दिली आहे. त्यानंतर शांततेच्या मार्गाने चाललेलं हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्धनग्न मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुंबईच्या वेशीवर अडवलं
साताऱ्यातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईत अडवण्यात आलं होतं. मानखुर्द इथं पोलिसांनी हा मोर्चा अडवला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.

गेल्या 10 वर्षांपासून या भूसंपादनाला शेतकरी विरोध करत आहेत, मात्र याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचं अस्त्र उपसलं होतं. काल हा मोर्चा नवी मुंबईत धडकला होता. मात्र त्यांचं म्हणणं ऐकण्याऐवजी पोलिसांनी त्यांचा मोर्चाच अडवला.  सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नसलेल्या या मोर्चेकऱ्यांना अखेर दुपारी त्यांच्याच गावातल्या बांधवांनी जेवणं करून आणून दिलं होतं.  सकाळी हा मोर्चा वाशीचा खाडी पूल ओलांडून मानखुर्दच्या बाजूला पोहोचला असताना मुंबई पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी वाहतूक कोंडीचं कारण दिलं होतं.  सातारा जिल्ह्यातल्या धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे गावातील शेतकरी खंडाळ्याहून अर्धनग्नावस्थेत पायी चालत आले आहेत.