मुंबई : एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांना 2500 रुपये तर अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.


याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना 10 टक्के इतकी अंतरीम वेतनवाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही आज जाहीर करण्यात आला. एसटी कर्मचारी अडीच हजार आणि अधिकाऱ्यांना पाच हजार  रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी भेट अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीनं देण्यात यावी, अशा सूचना रावतेंनी दिल्या आहेत.


एसटी अधिकाऱ्यांना 10 टक्के अंतरीम वेतनवाढ


एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के इतकी अंतरीम वाढ जाहीर केली असून ऑक्टोबर 2018 पासून ही वेतनवाढ लागू होईल. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच मोठी वेतनवाढ दिली आहे. याबाबत अभ्यास करुन महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के इतकी अंतरीम वाढ करण्यात येत असल्याचे रावते यांनी जाहीर केले.


एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ


एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य शासनाप्रमाणे एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली. ऑक्टोबर 2018 च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल.


एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतील थकबाकीतील 5 हप्त्यांची रक्कमही दिवाळीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला देण्यात यावी, असे आदेशही महामंडळाला दिवाकर रावते दिले आहेत.