मुंबई: सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई-गोवा महामार्गावर रायगड ते सिंधुदुर्ग अशी पाहणी करत आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांनी रायगडमधील पेणपासून सावंतवाडीपर्यंतच्या रस्त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.


यावेळी एबीपी माझाशी बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्ग मोटरेबल म्हणजेच किमान सुखकर प्रवास व्हावा असा तयार असेल, असं कोकणवासियांना आश्वस्त केलं.

मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणं म्हणजे कठीण काम आहे. त्यातच खड्ड्यांमुळे अनेक अपघातही होत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी सातत्याने होत आहे.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावर रायगड ते सिंधुदुर्ग असा पाहणी दौरा आयोजित केला आहे.

या हायवेचं काम 2011 पासून सुरु आहे ते आजपर्यंत संपलेलं नाही. त्याबाबत चंद्रकांतदादा म्हणाले, “मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की हे काम 2011 पासून सुरु असलं तरी, भूमी अधिग्रहणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कायद्याप्रमाणे अधिग्रहण करत असताना, अनेकांनी न्यायालयातून स्थगिती आणली. त्यात अनेक वर्ष गेली. या मार्गावर मोठा अडथळा होता तो कर्नाळा अभयारण्याचा. या अभयारण्याची परवानगी मिळताना अक्षरश: जीव निघाला. अखेर सशर्त परवानगी मिळाली. पण ती मिळण्यात खूप दिवस गेले.

आता गणपतीपूर्वी रस्ता सुरळीत होईल, यासाठी खूपच वेगाने काम सुरु आहे. 9 सप्टेंबरपूर्वी ‘मोटरेबल’ हा शब्द महत्त्वाच आहे. तो शब्द चांगला नाही, पण निदान गाड्या सुखरुप जाणं असं काम करतोय”.

सध्या आम्ही कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरळीत रस्ता बनवण्यासाठी प्राथमिकता देत आहोत. यावर्षी खूप पाऊस झाल्याने रस्त्याचं मोठं नुकसान झालं. सकाळी बनवलेला रस्ता संध्याकाळी उखडला गेला. आता पाऊस संपेल आणि पुढचा पाऊस सुरु होईल, तोपर्यंत मुंबई - गोवा महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात झालं असेल. पुढच्या पावसाळ्यानंतरही उरलेलं काम होईल. त्यामुळे डिसेंबर 2019 पर्यंत मुंबई - गोवा हा रस्ता पूर्णत: चकाचक होईल, यात मला शंका नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.