मुंबई : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्या हातात शिवबंधन बांधलं. मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ही माहिती देण्यात आली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख हे अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अखेर आज त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेचे ताकद वाढणार आहे. माजी दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर पोकळी भरुन काढण्यासाठी गडाख यांचा शिवसेना प्रवेश पक्षाला नवसंजिवनी देणारा आहे. शिवसेनेने शंकरराव गडाख यांच्यावर नगरची जबाबदारी सोपवली आहे.
जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिन : शंकरराव गडाख
"शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करुन यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिल," अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.
कोण आहेत शंकरराव गडाख?
शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत.
नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
सत्तास्थापनेदरम्यान त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत.