मुंबई : मुंबईमधील रस्ते बनवण्याच्या टेंडर प्रक्रियेमध्ये महापालिका आयुक्तांनी बदल केले आहेत. या बदलामुळे मुंबईमधील रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षी चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार नाहीत, अशी भीती नगरसेवकांनी पालिकेच्या स्थायी समितीत व्यक्त केली आहे.


मुंबईमधील 360 रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली होती. त्यासाठी 960 कोटी रुपये खर्च केले जाणार होते. त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र यावर्षीही मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने पालिकेवर टीका झाली. या टीकेमुळे पालिका आयुक्तांनी कंत्राटदारांकडून हमी कालावधीसाठी 20 टक्के ऐवजी 40 टक्के अनामत रक्कम घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कंत्राटदारांनी 40 टक्के वाढीव दराने टेंडर भरली.

कंत्राटदारांनी टेंडर जास्त किंमतीची भरल्याने ती रक्कम कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा टेंडर पुन्हा काढली जातील. यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी उशीर होणार असल्याने पुढील वर्षी पावसाळ्यानंतरच रस्ते कामाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे.