मुंबई : म्हाडाने 1384 घरांसाठी जाहीर केलेल्या घरांसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिक अर्ज म्हाडासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांसाठी हक्काची लॉटरी म्हणून म्हाडाच्या दरवर्षीच्या लॉटरीकडे अनेक मुंबईकरांचे लक्ष लागलेले असते. या घरांसाठी 10 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

यंदा म्हाडाच्या कोट्यवधींच्या घरांसाठी स्पर्धा रंगण्याची चिन्हं आहेत. यंदाच्या लॉटरीची विशेष बाब म्हणजे उच्च उत्पन्न गटातल्या तीन घरांची किंमत पाच कोटींपर्यंत असूनही तब्बल 130 अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईतील ग्रँट रोड भागातील खंबाला हिल इथल्या धवलगिरी इमारतीत ही घरं आहेत. या घरांचे क्षेत्रफळ 985 चौरस फूट इतकं आहे. एरवी म्हाडाच्या महागड्या घऱांना एखादाच अर्ज प्राप्त होत होता.

म्हाडाने 1384 घरांसाठी 5 नोव्हेंबर 2018मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ऑनलाइन अर्जांसाठी नोंदणीस प्रारंभ करण्यास सुरुवात झाली.

म्हाडाला प्राप्त झालेल्या अर्जांची यादी 14 डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध होणार आहे. तर 16 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता 1384 घरांसाठीची सोडत निघणार आहे.

म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती यंदा 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. तरीही म्हाडाने यंदा सर्वाधिक किंमतीच्या सदनिकांचा विक्रम मोडीत काढला आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे कराल?

https://lottery.mhada.gov.in

एकूण सदनिका-1384

कुठे किती घर ?

अँटॉप हिल वडाळा 278

प्रतीक्षा नगर,सायन 89

गव्हाण पाडा, मुलुंड 269

पी एम जी पी मानखुर्द 316

सिद्धार्थ नगर गोरेगाव(पश्चिम) 24

महावीरनगर,कांदिवली(पश्चिम) 170

तुंगा,पवई 101

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा मार्फत प्राप्त सदनिका(मुंबई शहर) 50

विकास नियंत्रण विनियम 33(5)अंतर्गत प्राप्त सदनिका 19

विखुरलेल्या सदनिका 68