ठाणे : वाहतुकीचे नियम मोडत गाडी चालवणाऱ्या चालकाला चाब विचण्यास गेलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. आदित्य फड असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधार सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तीनहात नाका सिग्नलवर विरुद्ध दिशेने कार घेऊन जाताना आदित्य फडला वाहतूक पोलीस अजित खैरमोडे यांनी रोखलं. खैरमोडे यांनी आदित्यकडे लायसन्स मागणी केली.
मात्र आदित्यने वाहतूक पोलिसांना उद्धटपणे उत्तर देत, लायसन्स नाही, मी सरकारी वकिलाचा मुलगा आहे, काय करायचं ते करा, अशी धमकी दिली. त्यानंतर आदित्यने खैरमोडे यांच्या अंगावर गाडी घालत तेथून पोबारा केला. हा सगळा प्रकार तेथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
खैरमोडे यांनी वायरलेसवर घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर नितीन कंपनीजवळ आदित्यला वाहतूक पोलिसांनी पकडलं. आदित्यला त्याच्या बलेनो गाडीसह नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे त्याच्याविरोधात वाहतूक पोलीस अजित खैरमोडे यांनी गुन्हा दाखल केला.
ठाणे जिल्हा सत्र न्यायलयातील माजी सरकारी वकील संगीता फड यांचा मुलगा असल्याचे आदित्यने सांगितले. नौपाडा पोलिसांनी मात्र आदित्य फड याच्या विरोधात 359,अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.