मुंबई: पाणीबाणीचं संकट केवळ मराठवाडा-विदर्भावर आहे असं नाही. मुंबईत आणि ते ही मंत्रालय परिसरात, मंत्र्यांच्या बंगल्यात पाणीबाणीची स्थिती आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच पाणी-बाणीच्या स्थितीला तोंड द्यावं लागत आहे. कारण, त्यांच्या शासकीय बंगल्यातलं पाणी संपलं आहे. त्यामुळे बाजूच्या बंगल्यावरुन त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाणी भरुन आणण्याची वेळ आली आहे.

धनंजय मुंडेंसह अन्य मंत्र्यांचे बंगले मंत्रालय परिसरातच आहेत. मंत्रालय परिसरातच पाणी संकट ओढवल्याने सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. गेले सहा दिवस विरोधीपक्ष नेत्यांसह, मंत्र्यांचा स्टाफ पाण्याअभावी त्रस्त आहे. बाजूच्या बंगल्यातून किंवा टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, गेले आठ दिवस पाणी येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत काम सुरु आहे. पाणी पुरवणाऱ्या कनेक्शनमध्ये काही समस्या आहेत. आज दुपारपर्यंत ही समस्या सुटेल, असं अ वॉर्डचे अधिकारी किरण दिगावकर यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका जलविभागाची माहिती

मुंबईला दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

या पाणीपुरवठ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मात्र, गेले काही दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या.

25, 26 सप्टेंबर रोजी पवई-वेरावली बोगद्याचे काम हाती घेण्यात आले होते.

तेव्हा मोठ्या पाईपलाईनमधील पाणीपुरवठा काही काळ थांबवून पुन्हा सुरु करण्यात आला.

दरम्यान, रिकाम्या पाईपलाईमधील हवेच्या दाबामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन, काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.