मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबीरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला 15 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. निधीअभावी मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीसाठी रखडलेल्या संक़्रमण शिबिरांच्या डागडूजीचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडे 200 कोटींची मागणी यापूर्वी म्हाडाने केली होती.
मुंबईत म्हाडाची 56 संक्रमण शिबिरे असून त्यात 21,135 गाळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी त्यांची दुरुस्ती झाली नसल्याने संक्रमण शिबिराची अवस्था फार वाईट झाली होती. यावर मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बैठका घेऊन संक्रमण शिबीरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. सरकारकडे म्हाडाने जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने म्हाडाला 100 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला. आता म्हाडाकडून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला 15 कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याने संक्रमण शिबिरातील हजारो गाळ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न आता निकाली निघणार आहे.त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील उपलब्ध संक्रमण शिबिरातील 8 हजार 448 गाळ्यांमध्ये अपात्र अथवा अनाधिकृत रहिवाशी वास्तव्यास असून यापैकी काही रहिवाशी 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून तेथे राहत आहेत. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने या सर्व रहिवाशांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. निधी अभावी संक्रमण शिबीरातील इमारतींची डागडूजी, गळती, प्लास्टर, रंगकाम, पॅसेजमधील कामे, लादीकरण अशी कामे रखडली होती.
प्राधिकरणाच्या बैठकीत याविषयी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करुन 15 कोटी इतका निधी उपलब्ध करुन घेतला असून तो मुंबई उपनगरातील सुमारे 10 ठिकाणच्या संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार असल्याची माहिती घोसाळकर यांनी दिली.
म्हाडा संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी 15 कोटींचा निधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2019 01:02 PM (IST)
मुंबईत म्हाडाची 56 संक्रमण शिबिरे असून त्यात 21,135 गाळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी त्यांची दुरुस्ती झाली नसल्याने संक्रमण शिबिराची अवस्था फार वाईट झाली होती. म्हाडाकडून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला 15 कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याने संक्रमण शिबिरातील हजारो गाळ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न आता निकाली निघणार आहे.त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -