म्हाडाचा रिचा बिल्डरला दणका, 1384 प्रकल्पग्रस्त कुटुंबांना न्याय मिळाला
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2019 12:35 PM (IST)
लोकांचे भाडं थकवणाऱ्या कुठल्याही बिल्डरला पाठीशी घातलं जाणार नाही, शिवाय त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची प्रतिक्रियाही म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.
मुंबई : मुंबईतील मुलुंडमधील 1384 प्रकल्पग्रस्त कुटुंबांना म्हाडाने न्याय मिळवून दिला आहे. रिचा बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी मुलुंडमधील पुनर्विकास प्रकल्पग्रस्तांचं तब्बल साडे पाच कोटीचं भाडं थकवलं होतं. त्याप्रकरणी म्हाडाने कारवाई करत प्रकल्पग्रस्तांना त्यांचं थकलेलं भाडं मिळवून दिलं. शिवाय, लोकांचे भाडं थकवणाऱ्या कुठल्याही बिल्डरला पाठीशी घातलं जाणार नाही, शिवाय त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची प्रतिक्रियाही म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. रिचा डेव्हलेपर्सने 2015-16 पासून प्रकल्पग्रस्तांचं भाडं थकवलं होतं. 2007 सालापासून मुलुंडमध्ये पुनर्विकासाचं काम सुरु आहे. पण गेल्या चार वर्षांपासून म्हणजेच 2015-16 पासून रिचा डेव्हलपर्सने तब्बल 1384 प्रकल्पग्रस्त कुटुंबाचं भाडं थकवलं होतं. स्थानिकांच्या तक्रारीनंतर उदय सामंत यांनी कारवाई करत त्यांचं थकलेलं भाडं मिळवून दिलं. उदय सामंत यांच्या कारवाईमुळे मुलुंडमधील रहिवाशांसाठी आजचा दिवस दिवाळीसारखाच आहे. तसंच आज संध्याकाळी उदय सामंत यांचा स्थानिकाकडून जाहीर सत्कारही होणार आहे.